गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४
शिव ऐसा मंत्र सुलभ सोपा रे।
जपावा परिकर नित्य नेमे॥
न बाधीच विघ्न संसाराचे भान।
धन्य ते भजन शिवनामे॥
एका जनार्दनी नाम शिव ईशान।
वदता घडे पुण्य कोटी यज्ञ॥


ॐनमोजी शिवा। नमो तुज महादेवा।
करुनी उपकार जीवा।अवतार धरिला॥
सोपा मंत्र रामनाम।तेणे झाले सर्व काम।
साधनांचा श्रम।गोवा उगविला॥
बैसोनिया दृढासनी।नाम जपे निशिदिनी।
तयासी अवनी। सोपी दिसे॥
बरवे साधन उत्तम।अवघा निवारिला श्रम।
गाता तुमचे नाम।वंद्य तिही लोकी॥
जडजीव उध्दरिले।कलिमाजी सोपे केले।
रामनाम जप वहिले। थोर साधन हे॥
अवतार धरुनी साचा।उध्दार केला जडजीवांचा।
एका जनार्दनी नामाचा।वाढविला महिमा॥

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०१४

 
ज्ञान वैराग्य कावडी खांदी|
शांती जीवन तयामधी॥
शिवनाम तुम्ही घ्या रे।
शिवस्मरणी तुम्ही रहा रे॥
हरिहर कावड घेतली खांदी।
भोवती गर्जती संतमांदी॥
एका जनार्दनी कावड बरी।
भक्ती फरारा तयावरी॥


 नित्य शिव शिव आठव।
तुटेल जन्ममरण भेव॥
दुजे नाही पै साधन।
वाचे वदावा ईशान॥
ऋध्दिसिध्दी पाया लागे।
हृदयी सदाशिव जागे॥
शंकर हा जया चित्ती।
जवळी तया भुक्ती मुक्ती॥
एका जनार्दनी सर्वदा।
महादेव वाचे वदा॥


 ज्ञानाचे जे अधिष्ठान।
महादेव एकची जाण॥
कर्म उपासना साधन।
पै शिवचि अधिष्ठान॥
तेथुनी प्राप्त सर्व देवां।
मुखी शंकर वदावा॥
या कारणे शिवभक्ती।
जनहो करा दिनरात्री।
एका जनार्दनी शंकर।
पावती भवसिंधू पार॥